नाशिकविषयी

नाशिक अथवा नासिक महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे प्रचंड उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशकात गंगापूर येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिडको हा शहराचा नवीन भाग वसला आहे.

इतिहास

पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.

भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.

ऐतिहासिक कालखंड

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले मोगलांचे सुरत बंदर लुटून परतत असताना, त्यांचा पाठलाग करणाऱ्या रणदुल्लाखानाशी त्यांची लढाई शहरापासून जवळच असलेल्या दिंडोरी येथे झाली. नाशिक जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे शिवपूर्वकालीन व शिवकालीन किल्ले आहेत.

पेशवे घराण्यातील आनंदीबाई पेशवे येथे राहण्यास होत्या. त्यांच्या नावाने आनंदवली हे ठिकाण ओळखले जाते. तेथे त्यांचा महालही होता. 'आनंदवली' हे 'आनंदीबाईंची हवेली' याचा अपभ्रंश असल्याचे म्हटले जाते.

आधुनिक काळातील इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे. तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या खोलीवर हुतात्मा कर्वे व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत. याच इमारतीच्या आसपास दुष्ट ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा, याचा आराखडा ठरवला गेला. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता.

भारतीय चित्रपटाचा उगम नाशकाशी निगडित आहे; कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव, १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे. फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशकातच सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.

सिंहस्थ कुंभ मेळा

हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी व चवथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन और नासिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.

नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुभ मेळा दर बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखो-करोडोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २००३साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०१५ साली.

हवामान

पावसाळ्याव्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान ४६.७° से. नोंदले गेले. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान ०.६° से. नोंदले गेले. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे.

अर्थकारण

महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे.

शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, महिंद्र अँड महिंद्र, मायको, क्राँप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अँड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑयल इंजन, अमेरिकन टुरीजम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तसेच नाशिक रोड येथे इंडियन करन्सी प्रेस हा नोटांचा छापखाना, तसेच इंडिया सिक्युरिटी प्रेस पासपोर्ट व स्टॅम्प छपाई होते. नाशिकहे वाईन साठी प्रसिध्द असलेले शहर आहे. इथे भरपूर वाईन कंपनी आहे. त्या प्रसिध्द सुलावाईन , योकवाईन , विंचूरावाईन इत्यादी आहे.

धार्मिक स्थळे

  • त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि.मी. अंतरावर आहे.
  • निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
  • अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
  • सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
  • नारोशंकर घंटा ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
  • गंगाघाट, पंचवटी
  • राम कुंड - गोदावरी नदीवरील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहिशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  • सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा.
  • काळा राम मंदिर - काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर
  • सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे,
  • सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.
  • कपालेश्वर मंदिर - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
  • एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी
  • एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी
  • मुक्तिधाम (नाशिक रोड)
  • भक्तिधाम (पेठ नाका)
  • नवश्या गणपती
  • इच्छामणी गणपती (उपनगर )
  • आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
  • कालिका मंदिर, नाशिकचे ग्रामदैवत
  • विल्होळी जैन मंदिर
  • रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ (चांदीचा गणपती)
  • वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना.
  • चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहे.
  • पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
  • फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
  • सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
  • खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कँपपाशी आहे.
  • रामशेज किल्ला
  • नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.
  • सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
  • कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि.मी. अंतरावर आहे.
  • नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य.
  • अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली.

विभागीय क्रीडा संकुल

ताजा बातम्या



जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.