महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू तयार व्हावेत या दृष्टीने राज्यातील खेळ परंपरा, अंत:सामर्थ्य व खेळ सुविधा लक्षात घेऊन या क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्याच्या वेगवेगळया भागातील विशिष्ट खेळामधील विजयाची परंपरा व त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सोई सुविधा या बाबींचा विचार करुन प्रत्येक प्रबोधिनीसाठी वेगवेगळे क्रीडा प्रकार निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाने दि. ३१ जानेवारी १९९६ रोजी क्रीडापीठाची मुहूर्त मेढ पुणे येथे रोवली व राज्यात ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यांत आल्या.
क्रीडा प्रबोधिनीत निवड करण्यांत आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, क्रीडा गणवेष इ. वरील खर्च शासनाच्या क्रीडापीठाच्या तरतूदीतून भागविण्यात येतो. सरासरी रु. ७,५००/- दरमहा प्रत्येक खेळाडूवर खर्च करण्यात येतो.
उद्देश
आठ ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांमुलींची भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुरस्कृत केलेल्या बॅटरी ऑफ टेस्टद्वारे निवड करुन आठ ते दहा वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे वैज्ञानिक पध्दतीचा अवलंब करुन व अदयावत क्रीडा उपकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे हा क्रीडा प्रबोधिनीचा उद्देश आहे.
नाशिक येथील क्रीडा प्रबोधिनी सध्या विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे सु डिग्री आहे. अद्यावत वसतिगृहात खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाशिक येथील क्रीडा प्रबोधिनीत सध्या शुटींग या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येते. विभागीय क्रीडा संकुलात १० मी., २५ मी., आणि ५० मी. शुटींग रेंज उपलब्ध आहे. या क्रीडा प्रबोधिनीमध्ये सध्या ११ खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत :
अ.क्र | खेळाडूचे नांव | अ.क्र | खेळाडूचे नांव |
---|---|---|---|
१ | महेश प्रविण आव्हाड | २ | प्रतिक बोरसे |
३ | संचित आगाशे | ४ | संदिप पवार |
५ | रोहण काशिद | ६ | इफेखारोद्दीन कादरी |
७ | सागर उखरे | ८ | नितीन चव्हाण |
९ | स्वप्निल कुसाळे | १० | पंकज देसाई |
११ | श्रेया संजय गवांडे |
क्रीडा प्रशिक्षण ही क्रीडा प्रबोधिनीची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू घडविण्यासाठी दीर्घ मुदतीची आवश्यकता आहे. या उदिद्ष्टासोबत सन २००२ च्या आशियाई स्पर्धाचे लक्ष समोर ठेवून कांही अल्पकालिन क्रीडा योजना कार्यान्वित करण्याचे उदिद्ष्टही क्रीडा प्रबोधिनीनी आपल्या समोर ठेवले आहे, त्यासाठी खालील बाबीवर लक्ष केंद्रीत करुन, ही अल्पकालीन योजना सफल करण्याचे या क्रीडा प्रबोधिनीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या क्रीडा प्रशिक्षण घेणा-या प्रशिक्षणार्थींची संख्या ७०० इतकी आहे.
प्रशिक्षण
प्रशिक्षणासाठी क्रीडा प्रबोधिनित मानधनावर क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांना एन.आय.एस.पदविका राज्य/क्रीडा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार ही पात्रता गृहीत धरुन मानधन देण्यात येते.
प्रशासन
क्रीडा प्रबोधिनीचे प्रशासन परिणामकारकरित्या राबविण्यासाठी सेवानिवृत्त सैन्यातील अधिकारी तसेच क्रीडा क्षेत्रातील तज्ञ अनुभवी व्यक्तींची मुलाखतीद्वारे निवड करुन प्राचार्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्राचार्याना मदत करण्यासाठी म्हणून प्रत्येक प्रबोधिनीला टंकलेखक, लिपिक, शिपाई, ग्राऊंडमन मानधनावर नेमण्यांत आले आहेत. प्रत्येक क्रीडा प्रबोधिनीसाठी वसतीगृह, खेळाची मैदाने, वाचनालये, भोजनगृह, करमणूक कक्ष यांची उपलब्धता स्थानिक संस्था/महानगरपालिका यांच्या सहकार्याने करण्यात आली असून आवश्यक तो कर्मचारी मानधनावर नियुक्त करण्यांत आला आहे.
शैक्षणिक सुविधा
क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थ्यांना क्रीडा प्रबोधिनीच्या जवळपास असलेल्या चांगल्या दर्जाच्या शाळा / महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. या प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक खर्च क्रीडा प्रबोधिनीमार्फत करण्यात येतो.
क्रीडा गणवेश
प्रत्येक प्रशिक्षणार्थीला मैदानावरील सरावाकरीता क्रीडा गणवेेश उपलब्ध करुन देण्यात येतो.
क्रीडा साहित्य
या क्रीडा प्रबोधिनीच्या फिजिकल फिटनेस या प्रकाराकरिता सर्व आवश्यक व अत्याधुनिक खेळ साहित्य तसेच शारीरिक शक्ती, शारीरिक क्षमता व चपळता या बाबीच्या अनुषंगाने आवश्यक असे साहित्य या क्रीडा प्रबोधिनीला देण्यात येते.
भोजन व्यवस्था
सकस व परिपूर्ण आहाराचे क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक विशेेष महत्व आहे. क्रीडा प्रशिक्षणाद्वारे अपेक्षित परिणामांचा खेळाडूंच्या आहाराशी सरळ संबंध असतो. त्यामुळे क्रीडा प्रबोधिनीद्वारे याबाबतीत आवश्यक ती काळजी कटाक्षाने घेतली जाते. आहार शास्त्रावरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षणार्थींच्या आहाराची सूची तयार करण्यांत आली आहे. त्या सूची नुसार भोजन व्यवस्था कंत्राट पध्दतीचा अवलंब करुन क्रीडा प्रबोधिनींच्या खेळाडूंना उपलब्ध करण्यात आली आहे. आहारात सकाळचा चहा व नास्ता दूध, दुपारचे जेवण, शाळेतून परत आल्यावर (प्रशिक्षणार्थी) न्याहरी, प्रशिक्षणानंतरची न्याहरी, रात्रीचे जेवण व झोपण्यापूर्वी दूध यांचा समावेश आहे. आहारात अंडी, समिश्र व्यंजने फळे, हिरव्या पालेभाज्या, दही, दूध इ. आवश्यक गोष्टींचा समावेश केला जातो.